महत्वाच्या घडामोडी

तर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला

प्रतिनिधी
Jan 04 / 2019

नवी दिल्ली: अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सुनावणीवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले की, या प्रकरणी चर्चा होणे आवश्यक असून याला कोर्टात घेऊन जाण्याची गरजच पडायला नको. तर दुसरीकडे श्री राम जन्मभूमी न्यासाचे वरिष्ठ सदस्य आणि खासदार डॉ. रामविलास दास वेदांती यांनी देखील स्थानिक पातळीवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर तोडगा काढण्यावर भर दिला. ते म्हणाले की, राम मंदिराच्या निर्मितीवरुन मुसलमानांसोबत चर्चा होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत बैठक झाली आहे. याचा अहवालही तयार आहे. आता त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणेच बाकी आहे.श्री राम हे केवळ हिंदूंचेच दैवत नाही तर संपूर्ण जगाचे दैवत आहेत. श्री रामाशी कोणाचेही वैर नाही आणि असायलाही नको. या प्रकरणीचा वाद सोडवून मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी वीट लावायला जाईल, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.