पावसाळी पर्यटन

शित्तूर-वारूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता हे पद जवळजवळ दोन वर्षांपासून रिक्त; हे पद तातडीने भरण्याची प्रगती फाउंडेशनची मागणी

प्रतिनिधी
Jul 30 / 2018

शाहुवाडी प्रतिनिधी (दि. ३०) शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील रूग्णांसाठी मोलाचा आधार असलेल्या शित्तूर-वारूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळजवळ दोन वर्षांपासून औषध निर्माता हे पद रिक्त आहे ते त्वरित भरण्यात यावे असे निवेदन प्रगती फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष सतिश नांगरे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी योगेश साळेसाहेब यांना दिले. डोंगर-कपारीत वसलेली तेरा गावे व वाड्या-वस्त्या या आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येतात. धनगर-माळी, गोरगरीब रूग्णांसाठी हे आरोग्य केंद्र म्हणजे मोलाचा आधार आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यंत जबाबदारीचे असलेले औषध निर्माता हे पद जवळजवळ दोन वर्षांपासून रिक्त आहे. या आरोग्य केंद्रात सध्या औषध निर्मात्याचे काम हे शिपाई वर्ग करत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून माणसाच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावणारे औषध निर्माता हे पद लवकरात-लवकर भरण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतिश नांगरे, जयभवानी दुध संस्थेचे प्रमुख शंकर ढवळे आदि मान्यवर उपस्थित होते.