पेज३

मॉडेलची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरुन फेकला

प्रतिनिधी
Oct 16 / 2018

मालाडच्या माईंड स्पेस परिसरात रस्त्याच्या कडेला फेकलेल्या एका बॅगेमध्ये मानसी दीक्षित (20) या मॉडेलचा मृतदेह सोमवारी दुपारी सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या तीन तासांत छडा लावत बांगूरनगर पोलिसांनी आरोपी मुजम्मील सय्यद याला बेड्या ठोकल्या आहेत.डबल रोडच्याकडेला एक ट्रॅव्हल बॅग संशयास्पदरीत्या फेकण्यात आल्याची माहिती मिळताच बांगूरनगर पोलिसांनी धाव घेत बॅग उघडून बघितली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला. प्रचंड गतीने तपास चक्रे फिरवत पोलिसांनी या तरुणीची ओळख पटविली.मूळची राजस्थानमधील मानसी अंधेरीमध्ये राहात होती. मॉडेलिंग करणार्‍या मानसीची काही महिन्यांपूर्वीच आरोपी सय्यदशी ओळख झाली होती. मुजम्मिलने मानसीला त्याच्या ओशिवराच्या घरी बोलवले असता दोघांत जोरदार भांडण झाले आणि मुजम्मिलने मानसीच्या डोक्यात जड वस्तूचा घाव घातला. ती जागीच ठार झाली. मुजम्मिलने मानसीचा मृतदेह बॅगेत टाकला व रिक्षाने ही बॅग मालाडच्या एका रोडवर टाकून दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या रिक्षाचा शोध घेत पोलीस मुजम्मिलपर्यंत पोहोचले.