कोल्हापूर

सावली केअर सेंटरच्या विकलांग मुलामुलींसाठीच्या निवासी स्वावलंबन शिबिराची सांगता

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

कोल्हापूर : त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. ‘स्टार बझार’सारख्या मॉलमध्ये फेरफटका मारुन स्वत:ला आवडणार्‍या वस्तूची स्वत: खरेदी करणं, पी.व्ही.आर.सारख्या थिएटरमध्ये जाऊन सर्वांसोबत सिनेमा पाहाण्याची मजा लुटणं, त्यानंतर संध्याकाळ झाली असली तरी रंकाळा तलावाच्या काठावर फेरफटका मारुन चाट, पाणीपुरी, आईस्क्रीम अशासारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं या गोष्टी सावली केअर सेंटर तर्फे आयोजित निवासी स्वावलंबन शिबिराच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थी बहुतेक मुलामुलींनी आयुष्यात प्रथमच अनुभवल्या. मुलांच्या चेहर्‍यावरची खुषी पाहून त्यांचे पालकही सुखावले नसते तरच नवल! वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्त्व असणार्‍या व्यक्तींना सामाजिक जीवनातील छोट्या मोठ्या आनंदांपासूनही वंचित राहावं लागतं ही बाब लक्षात घेऊन या व्यक्तींना शक्य तितक्या प्रमाणात स्वावलंबी होण्यासाठी छोट्यामोठ्या युक्त्या शिकवणं, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या दृष्टीने त्यांना आत्मविश्‍वास देण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर आपण काहीच करू शकण्याच्या अवस्थेत नाही या मानसिकतेतून अशा व्यक्तींना बाहेर काढून त्याही जीवनाचा आनंद घेऊ शकतात याची जाणीव करुन देणं अशा उद्देशाने सावली केअर सेंटरतर्फे 13 मे ते 13 जून या कालावधीसाठी निवासी स्वावलंबन शिबीराचे आयोजन केले होते. बुधवारी सकाळी सर्व शिबिरार्थींना निरोप देण्यात आला, पण तत्पूर्वी म्हणजे मंगळवारी त्यांनी त्यांच्या पालकांसह सिनेमागृह, मॉल, रंकाळा तलावाचा परिसर या ठिकाणी आवर्जून नेऊन वेगळे अनुभव घेतले. सेरेब्रल पाल्सी असणारी मुलंमुली या शिबिराच्या निमित्तानं प्रथमच आईवडिलांपासून एक महिन्यासाठी दूर राहिली. महिन्याभरासाठी त्यांचं सगळं वेळापत्रक आणि वातावरणच या शिबिरामुळं बदलून गेलं होतं. परिणामी काल सावली केअर सेंटरचा निरोप घेताना या मुलांच्या मनात जशी वेगळी हुरहूर होती त्याचप्रमाणे त्यांना निरोप देताना सावली केअर सेंटर चे किशोर देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी हे ही भावविवश झाले. सर्वात बोलकी प्रतिक्रिया ही अनेक पालकांची होती. आपल्या मुलांना सावली च्या रुपात एक त्यांचं असं नवं घर मिळालं असं पालकांनी आवर्जून सांगितलं.

सावली केअर सेंटरच्या विकलांग मुलामुलींसाठीच्या निवासी स्वावलंबन शिबिराची सांगता
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *