कोल्हापूर

इस्रायल प्रमाणं कमी मनुष्यबळाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भरपूर उत्पादनं घेणारी शेती स्थानिक शेतकर्‍यांनी करावी - खासदार धनंजय महाडिक

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

इस्रायल प्रमाणं कमी मनुष्यबळाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भरपूर उत्पादनं घेणारी शेतीची पध्दत स्थानिक शेतकर्‍यांनी अवलंबली पाहिजे. त्यासाठी शासकीय चौकट मोडून कृषी विभागानं पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच शेतकर्‍यांचं प्रबोधन होईल, असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. गडहिंग्लज तालुका कृषी विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गडहिंग्लज तालुका कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं आणि कृषी विभागाच्या सहकार्यानं गडहिंग्लज मध्ये विशेष कार्यक्रम पार पडला. खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातून शेतकर्‍यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न झाला. कृषी पर्यवेक्षक म्हणून ३६ वर्षे सेवा बजावणार्‍या आणि क्रॉपसॅप योजनेत राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या रघुनाथ देसाई यांचा विशेष सन्मान खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. तर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरचं वितरण करण्यात आलं. तसंच शेतकर्‍यांना बियाणंही वाटप करण्यात आलं. यावेळी शेतकरी आणि कृषी कर्मचार्‍यांना आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आली. खासदार महाडिक यांच्या हस्ते घडी पत्रिकेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी, शेतामध्ये यंत्रांच्या सहाय्यानं पेरणी करण्याबाबतचं प्रात्यक्षिक दाखवलं. यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी, शेतीतील नवं तंत्रज्ञानाची गरज विषद केली. इस्रायल प्रमाणं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मनुष्यबळाच्या सहाय्यानं जास्तीत जास्त पीकं घेणारी पध्दती, भारतीयांनी आत्मसात करण्याची गरज आहे. याबाबतचं प्रबोधन कृषी विभागानं करावं, असं त्यांनी आवाहन केलं. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मात्सोळी, उप विभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम, तालुका कृषी अधिकारी रमेश भोसले, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष अतुल जाधव यांनी कृषी विभागाच्या वतीनं राबवण्यात येणार्‍या विविध योजनांबाबत माहिती दिली. त्यानंतर खासदार महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमाला माणिकराव भोसले, सुरेश देसाई, सुशांत देसाई यांच्यासह गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

इस्रायल प्रमाणं कमी मनुष्यबळाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भरपूर उत्पादनं घेणारी शेती स्थानिक शेतकर्‍यांनी करावी - खासदार धनंजय महाडिक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *