![]() |
Pune Rain update |
बारामती परिसरात ढगफुटीसारखा पाऊस: कालवा फुटला, पूरपरिस्थिती, जनजीवन विस्कळीत
पुणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असून बारामती, दौंड आणि इंदापूर या पट्ट्यांमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामतीमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे नीरा डावा कालवा फुटल्याने शेतशिवारात आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.
कालवा फुटला, शेती आणि रस्त्यांचे नुकसान
पिंपळी परिसरात कालवा फुटल्याने पालखी महामार्गावर पाणी साचले असून काटेवाडी-भवानीनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी या भागांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला. या भागातील अनेक घरे आणि शेतांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
धोकादायक इमारतीतून कुटुंबांचे स्थलांतर
पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतीतील नागरिकांना प्रशासनाने तत्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे. एनडीआरएफच्या दोन टीम्स बारामतीमध्ये दाखल झाल्या असून आपत्कालीन उपाययोजना सुरु आहेत.
बारामतीत एका रात्रीत 7 इंच पाऊस
बारामती तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी सुमारे 14 इंच आहे. परंतु केवळ मागील पाच दिवसांतच 314 मिमी (सुमारे 12.3 इंच) पावसाची नोंद झाली असून यातील 7 इंच पाऊस एका रात्रीतच पडल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणीपूर्व मशागत सुरू असतानाच पाण्याने शेतं व्यापल्याने पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.
मान्सूनचा वेग मंदावणार – शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
हवामान विभागानुसार 27 मेपासून मान्सूनचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, केवळ सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी व लागवड करू नये. पाऊस पुन्हा लांबणीवर पडल्यास पेरणीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सावध राहा, सुरक्षित रहा
बारामती, दौंड, इंदापूर या भागांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. पुराच्या पाण्यात अनावश्यकपणे फिरणे टाळावे आणि आपत्कालीन मदतीसाठी स्थानिक यंत्रणांशी संपर्क साधावा.
Sources: हवामान विभाग, कृषी विभाग, प्रशासनिक माहिती
0 टिप्पण्या