जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

jalna's-tejal-salve-gtrikes-gold-in-the-asia-cup!
jalna's-tejal-salve-gtrikes-gold-in-the-asia-cup!

धनुष्यबाण हातात घेत स्वप्नांची दिशा गाठणारी तेजल साळवे; आशिया कपमध्ये सुवर्ण जिंकून भारताचं नाव उजळलं!

जालना, २० जून २०२५: सिंगापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्रातील आणि जालन्याच्या तेजल साळवे हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. १६ ते २० जूनदरम्यान झालेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत तेजलने आपल्या सहकारी भारतीय खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाईचा १४६-१४४ असा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.


तिने याआधी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून, चीनमध्ये झालेल्या २०२४ च्या आशियन युथ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक तर, दक्षिण कोरियामधील २०१४ च्या आशिया कप स्टेज-३ मध्येही रौप्यपदक पटकावले होते. गोव्यात झालेल्या ३७व्या नॅशनल गेम्समध्ये तिने कांस्यपदक मिळवले होते. तिच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे तिला संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तिरंदाजी घराणं: तेजल, प्रांजल आणि आदर्श

साळवे कुटुंबातील तेजल ही एकमेव खेळाडू नाही, तर तिची बहीण प्रांजल साळवे हिनेही राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. तिचा भाऊ आदर्श साळवे देखील विभागीय व राज्य पातळीवर आर्चरीमध्ये चमक दाखवत आहे. या त्रिकुटाच्या खेळातील योगदानामुळे साळवे कुटुंब जालन्यातील एक आदर्श ठरत आहे.

रोज ८ तास सराव, ६ वर्षांची मेहनत

"गेल्या सहा वर्षांपासून मी सातत्याने सराव करत आहे. दररोज किमान आठ तास प्रॅक्टिस करून मी हे यश मिळवलं. आता माझं लक्ष्य आहे देशासाठी अधिक पदकं मिळवणं," असं तेजलने सांगितलं. ती सध्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत असून, तिची मेहनत आणि समर्पण स्पष्टपणे दिसून येतं.

कॅनडात होणाऱ्या जागतिक स्पर्धेकडे लक्ष

आता तेजल १४ ते २४ ऑगस्टदरम्यान कॅनडामध्ये होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या कामगिरीमुळे तिला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तिच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश तिच्याकडून अधिक आशा बाळगतो आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या