![]() |
SSC RESULT 2025 |
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची अधिकृत घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२५ च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार (१३ मे) रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळाचे सचिव श्री. देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. यंदा राज्यभरातील तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
निकाल कुठे आणि कसा पाहावा?
दहावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन स्वरूपात पाहता येईल. विद्यार्थ्यांना खालील वेबसाइट्सवर जाऊन आपला सीट नंबर टाकून निकाल पाहता येईल:
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- msbshse.co.in
यंदा परीक्षा वेळेत, निकाल लवकर
यंदा दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे निकालाची तारीख काय असेल याकडे विद्यार्थ्यांचे व पालकांचे विशेष लक्ष लागले होते. निकालाच्या वेळेची अधिकृत माहिती लवकरच बोर्डाकडून जाहीर केली जाणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षा व अपेक्षित निकाल
राज्य मंडळाने यंदा परीक्षेदरम्यान ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवले. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये मोठी घट झाल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. यंदा बारावीच्या निकालात दीड टक्क्यांनी घट झाल्याने, दहावीच्या निकालात वाढ होणार की घट याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा व अफवांपासून दूर रहावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या