![]() |
St mahamandal recruitment 2025 |
एसटी महामंडळात लवकरच भरती प्रक्रिया; शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होण्याची शक्यता असून, यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
सध्या एसटीच्या विविध विभागांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासते आहे. विशेषतः बांधकाम विभागात, जिथे भविष्यात पीपीपी तत्वावर प्रकल्प उभारले जाणार आहेत, तिथे कुशल अभियंत्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
आर्थिक अडचणीमुळे आणि न्यायालयाच्या निर्बंधामुळे मागील काही काळभर नोकरभरती थांबविण्यात आली होती. मात्र, येत्या काळात अनेक कर्मचारी निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी नवीन भरती करणे आवश्यक झाले आहे. ही भरती सरळसेवा तसेच करार पद्धतीने केली जाणार आहे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील टप्प्यात २५ हजार नव्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चालक, वाहक आणि इतर तांत्रिक पदांवर भरतीची आवश्यकता भासणार आहे. या संदर्भातील प्रस्तावालाही संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
नव्या बस सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळाची आखणी करण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या रिक्त पदांचा तपशील सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत अधिकाऱ्यांची भरतीही एसटीच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
0 टिप्पण्या